Top News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी दीड कोटींची तरतूद — डॉ. सुजय विखे पाटील यांची घोषणा

 



श्रीरामपूर (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन समोरील त्यांच्या स्मारकस्थळी उभारण्यात येणार असल्याची ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घोषणा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. या स्मारकासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक तरतूद त्यांनी जाहीर केली असून, यामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक एकात्मता आणि अभिमानाची लहर उमटली आहे. या घोषणेची माहिती स्वतः डॉ. सुजय विखे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना दिली. यावेळी पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी नियोजित जागेबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. आंबेडकर यांच्या नागपूर आणि नगर येथील पुतळ्यांच्या धर्तीवरच श्रीरामपूर येथे देखील आधुनिक रचनेतील प्रेरणादायी पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले. “हा पुतळा केवळ देखणा नसून लोकांच्या मनावर ठसा उमटवणारा आणि प्रेरणादायी असावा, यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” असे ते म्हणाले.


दरम्यान, स्मारकासाठी रेल्वे प्रशासनाकडे दोन गुंठे अतिरिक्त जागेची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सुभाष त्रिभुवन यांनी दिली. यासोबतच 16 डिसेंबर 1939 रोजी बेलापूर रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब आंबेडकर उतरल्यानाचा ऐतिहासिक संदर्भ देत, या स्टेशनचे नाव बदलून “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रीरामपूर रेल्वे स्टेशन” असे ठेवण्याची देखील मागणी त्यांनी यावेळी मांडली. या निर्णयामुळे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीला गती मिळाली असून, याप्रसंगी भीमराज बागुल, राजाभाऊ कापसे, सचिन ब्राह्मणे, विजय पवार, प्रकाश ढोकणे, राजू नाना गायकवाड, संतोष मोकळ, रमादेवी धीवर आदींनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा निळी टोपी व पुष्पहार घालून सन्मान केला.


या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, किशोर ठोकळ, रॉकी लोंढे, अमोल काळे, संजय बोरगे, सुमेध पडवळ, दादासाहेब बनकर, मिलिंद धीवर, उज्वला येवलेकर यांच्यासह भाजपचेही अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे मा. तालुकाध्यक्ष दीपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, मा. उपनगराध्यक्ष संजय फंड, माजी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. सभापती नाना शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद नवले, इंजिनिअर संदीप चव्हाण, तसेच अंजाबापू गोल्हार, भैय्या भिसे, शरद भणगे, राहुल शहाणे, रईस शेख, शाहरुख मन्सुरी, राकेश थोरात आदी मान्यवरांनी या ऐतिहासिक क्षणी उपस्थिती लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणीसाठी करण्यात आलेली ही तरतूद आणि या स्मारकाच्या माध्यमातून सामाजिक प्रेरणेचा केंद्रबिंदू निर्माण होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे श्रीरामपूरमध्ये सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. डॉ. आंबेडकर विचारांचे प्रतीक ठरणाऱ्या या स्मारकाच्या उभारणीमुळे आंबेडकरी समाजात समाधानाची लाट उसळली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने